कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) एन.डी.डी.बी,(मृदा), सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त विद्यमाने कार्बन क्रेडीट योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक महिलांसाठी गोकुळच्या माध्यमातून बायोगॅस योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ३ हजार बायोगॅस प्रकल्प पूर्ण झाले. यासाठी सिस्टीमा बायो, पुणे यांच्यावतीने गोकुळला ‘फ्लेम’अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने नेहमीच ग्रामीण दूध उत्पादक महिलांना केंद्रबिंदू मानून महिला दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. एनडीडीबी, गोकुळ, सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त विद्यमाने कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेअंतर्गत ५००० बायोगॅस मंजूर झाले असून ४१ हजार २६० रुपये किमतीचा बायोगॅस दूध उत्पादकांना ५ हजार ९९० रुपये इतक्या किंमतीला उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यामुळे लाभार्ती दूध उत्पादकांना ३५ हजार २६० इतकी थेट सबसिडी मिळाली आहे. जिल्ह्याचा विचार करता ५००० उत्पादकांना एकूण १७ कोटी ६३ लाख इतकी सबसिडी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेअंतर्गत सिस्टीमा बायो,एनडीडीबीकडून गोकुळने उपलब्ध करून दिली आहे. तसेच नवीन प्रस्तावित ५००० बायोगॅसना मंजुरीसाठी पाठपुरावा केला असल्याचे सांगितले.

सिस्टीमा बायो कंपनीचे झोनल मॅनेजर अनिकेत शिंदे म्हणाले की, भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात ही प्रमुख कार्यक्षेत्र असलेले राज्य आहेत. आज तागायात ५० हजार हून अधिक लाभार्थी आपल्या बायोगॅस युनिटचा लाभ घेत आहेत. कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना अत्यंत प्रभावीपणे राबवून महाराष्ट्रात सर्वात जास्त बायोगॅस बसवण्याच्या उच्चांक गोकुळने केला असून त्यासाठी सिस्टीमा बायो, पुणे यांच्यावतीने गोकुळला ‘फ्लेम’अॅवार्ड देऊन सन्मानित करत असल्याचे सांगितले.

यावेळी संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील–चुयेकर, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.