कोल्हापूर (प्रतिनिधी) : शनिवार पेठेतील माउली हॉस्पिटलसमोर पार्किंग केलेली कार काढण्यावरून झालेल्या वादातून हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली. डॉ. जयंता अभय पाटील व त्यांचा मुलगा विश्वजीत अभय पाटील (रा. शनिवार पेठ) यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जयंता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे यांच्यासह बारा जणांविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे याची कार घेऊन चालक मिलिंद कांबळे (रा. वंदूर, ता. कागल) हा मंगळवारी सायंकाळी शनिवार पेठेत आला होता. त्या वेळी त्यांनी ही कार माउली हॉस्पिटलसमोर लावली होती. ही कार बंद पडल्यामुळे कांबळे हाही कार सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान हॉस्पिटलमधील डॉ. जयंता पाटील व त्यांचा मुलगा विश्वजीत पाटील यांनी चालक कांबळे याला हॉस्पिटलसमोरून कार बाजूला काढण्यास सांगितले. त्यातून त्यांच्यात वादावादी झाली, ही बाब चालकाने जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे यांना फोनवरून कळवली.
त्यानंतर बँकेच्या संचालिका या ठिकाणी आल्या. त्या वेळी पुन्हा वादावादी झाली. तसेच साळुंखे यांच्यासोबत असलेल्या काही तरुणांनी हॉस्पिटलमधील साहित्याची तोडफोड केली. या वेळी झालेल्या मारहाणीत डॉ. जयंता पाटील व त्यांचा मुलगा विश्वजीत हे दोघे जखमी झाले. या प्रकरणी डॉक्टर जयंता पाटील यांनी रात्री उशिरा जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे यांच्यासह बारा जणांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार त्यांच्या विरोधात गुणः दाखल करण्यात आला असला, तरी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.