कोल्हापूर (प्रतिनिधी) : पेठवडगाव मधील कुडाळकर हॉस्पिटल मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक होत आहे .कोरोनाची लक्षणे नसताना देखील कोरोना असल्याचे भासवून रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेतले जात आहे.  उपचारशुल्क आणि औषधखर्च म्हणून गोरगरीब रुग्णांकडून लाखो रुपये उकळले जात आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष घालून या हॉस्पिटलविरोधात कडक कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे वडगाव शहरप्रमुख संदीप पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना दिला.        

या पत्रकार बैठकीस उपस्थित असलेल्या अनेक रुग्णांनी कुडाळकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी  रुग्ण गेल्यास न वापरलेल्या औषधांची बिले आकारणे, शासकीय योजनेत उपचार बसत नाही, असे खोटे सांगून विविध तपासण्या आणि सलाईन सारख्या उपचारासाठी भरमसाठ शुल्क आकारणे, आरोग्य विमा धारक रुग्णांकडून अतिरिक्त उपचारशुल्क वसूल करणे, एकाच पीपीई किटमध्ये हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांची तपासणी डॉकटर करत असताना सर्व रुग्णांकडून प्रत्येकी बारा हजार रुपये शुल्क पीपीई किट बिलापोटी लावणे, डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना त्यांच्याकडून औषधांचे बिल घेतले असतानाही डिस्चार्ज झाल्यानंतर शिल्लक औषधांच्या रकमेचा परतावा न करणे, ही शिल्लक औषधे परत द्या अशी मागणी केल्यास ती परत न देणे असे प्रकार घडत असल्याची कैफियत मांडली. या हॉस्पिटलमध्ये केवळ डॉ कुडाळकर आणि त्यांच्या पत्नी असे दोघेच वैद्यकीय अधिकारी पीपीई किट घालून रुग्ण तपासणी आणि उपचार करतात.

हॉस्पिटलमधील परिचारिका, वॉर्डबॉय यापैकी कोणीही पीपीई किटमध्ये नसते. तरीही रुग्णांच्या बिलात परिचरिकांच्या पीपीई किटचे बिल लावले जात असल्याचा आरोप या रुग्णांनी पत्रकारबैठकीत बोलताना केला. सलीमा पटेल या वृद्ध महिलेने कोरोनाची सौम्य लक्षणे असतानादेखील कुडाळकर हॉस्पिटलने आपल्याकडून तीन लाख सत्तर हजार रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप केला. आपले आणि सुनेचे दागिने विकून हॉस्पिटलचे बिल पूर्ण भरल्यानंतरच डिस्चार्ज देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. भरमसाठ पैसे घेऊन आपल्यासाठी मागवलेली औषधे डिस्चार्ज देताना हॉस्पिटलने परत देण्यास नकार दिल्याचा आरोप या वृद्ध महिलेने केला. जयसिंग जाधव या पन्हाळा तालुक्यातील नावली गावच्या तरुणाला केवळ दहा दिवसांच्या उपचारासाठी कुडाळकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्याकडून वेळोवेळी वीस हजार, पंधरा हजार, तर कधी तीस हजार, पन्नास हजार असे एकूण तीन लाख सत्तर हजार रुपये या हॉस्पिटलने जमा करून घेतले. या बिलाची रक्कम जमा करण्यास विलंब झाल्यास रुग्णाचा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याची धमकी डॉ सूरज कुडाळकर यांनी दिली होती, असा आरोप शिवसेनेचे वडगाव शहरप्रमुख संदीप पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

जयसिंग जाधव यांच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना तीन लाख सत्तर हजार रुपयांचे बिल न देता केवळ नव्वद हजार रुपयांचे बिल देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नव्वद हजार रुपयांचे बिल द्यायचे होते, तर तीन लाख सत्तर हजार रुपये या हॉस्पिटलने स्वीकारले कशाला असा प्रश्न संदीप पाटील यांनी यावेळी विचारला. या हॉस्पिटलमध्ये कोणतेही शासकीय नियम पाळले जात नसल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी बोलताना केला. बायोमेडिकल वेस्ट अर्थात या हॉस्पिटलमध्ये निर्माण होणारा जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट सनदशीर रित्या होत नाही .असा कचरा धोकादायक रित्या रस्त्यावर टाकणे, उघड्यावर जाळणे अशा पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. याबाबत वडगाव नगरपरिषदेने या हॉस्पिटलविरोधात पन्नास हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती संदीप पाटील यांनी पत्रकारांना दिली. सुजाता पाटील, तानाजी साळवी, संभाजी पाटील, नामदेव जाधव, बाजीराव जाधव ,आणि अशोक जाधव या रुग्णांसह, अतुल कसबेकर, हालीमा पटेल या रुग्णांना कुडाळकर हॉस्पिटलकडून आलेले विदारक अनुभव या रुग्णांनी पत्रकारांसमोर कथन केले. हालीमा पटेल या वृद्धेने तर अक्षरशः रडत रडत आपल्याला आलेले अनुभव कथन केले. या हॉस्पिटलच्या कारभाराची कसून चौकशी व्हावी आणि या हॉस्पिटलचा परवाना रद्द व्हावा,अशी मागणी त्यांनी केली. अशी कारवाई न झाल्यास कुडाळकर हॉस्पिटलविरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी शेवटी दिला. या पत्रकार बैठकीस बबलू खाटीक, अशोक जाधव, प्रवीण पाटील, किरण पडवळ तसेच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.