कागल (प्रतिनिधी) : हमीदवाडा साखर कारखाना कर्नाटकातल्या व्यक्तीला विकल्याचा धडधडीत १०० टक्के खोटा आरोप विरोधकांकडून केला आहे. राजकारणासाठी किती बदनामी आणि अपप्रचार करणार आहात ? असा संतप्त सवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पेरून मुद्दामहून श्री शाहू महाराजांच्या विरोधात विधाने करावीत, असा तर हेतू नाही ना ? त्यामुळे शाहू महाराजांची प्रतिमा डागाळली जाईल, अशी कोणतीही कृती करू नका, असा सल्लाही ना. मुश्रीफ यांनी दिला आहे.

कागलमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते खर्डेकर चौकात महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कऱण्यात आले.

ना. मुश्रीफ म्हणाले की, हमीदवाडा कारखाना विकलाय अशी शंभर टक्के खोटा आरोप केला जात आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मी अध्यक्ष आहे. बँकेचे त्या कारखान्यावर कर्ज आहे, कारखाना बँकेला तारण आहे. त्यामुळे तसे असते तर त्या विषयाची माहिती मला झालीच असती. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, यावर्षीच्या हंगामात सर्वप्रथम एफआरपी देणारा हमीदवाडा हा जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना आहे. तसेच दुसऱ्या दिवशीच्या महालक्ष्मी दूध संघ विकला, हमिदवाडा साखर कारखानाही विकावा लागेल, अशा आशयाची विधाने केली जात आहेत.

तसेच विरोधक श्री. महालक्ष्मी दूध संघ बंद असल्याचे सांगून शिळ्या कढीलाच ऊत आणत आहेत. महालक्ष्मी दूध संघ बंद झाल्यानंतर लोकसभेच्या तीन निवडणुका झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ आणि वारणा दूध संघ सक्षम असल्यामुळे त्यांच्यासमोर इतर दूध संघांचा टिकाव लागला नसून ते बंद झाले आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येताच संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा विरोधक पसरवत आहेत. जगातील कोणतीही शक्ती भारतीय संविधान बदलू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही समाज घटकांनी विचलित न होण्याचे आवाहन केले.

निवडणुका जवळ येत आहेत तसतसे वातावरण गरम होत आहे. आज हनुमान जयंती. हनुमान हे दैवत शक्तीचे प्रतीक. प्रभू श्रीरामचंद्रांवर हनुमानाची किती गाढ भक्ती होती, हे सर्वश्रुत आहे. या शुभ मुहूर्तावर प्रा. संजय मंडलिक यांच्या अंगी हनुमानाची शक्ती यावी अशी मी प्रार्थना करीत असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगरसेवक चंद्रकांत गवळी, अतुल जोशी, नामदेवराव पाटील, नवल बोते, ॲड. संग्राम गुरव, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, बाबासो नाईक, सतीश घाटगे, सागर गुरव, संजय फराकटे आदी उपस्थित होते.