कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (शुक्रवार) गांधीजयंतीचे औचित्य साधून बिंदू चौकात एक उपक्रम राबवण्यात आला. डोक्याला प्रबोधनाचे संदेश देणाऱ्या टोप्या आणि स्वच्छता, आरोग्य आणि व्यसनमुक्तीचा वेध घेत थुंकीमुक्त कोल्हापूरचा नारा बिंदू चौकात देण्यात आला. हा उपक्रम कोल्हापूर अँन्टी स्पिट मुव्हमेंटद्वारे राज्यभर राबण्यात येत आहे.

कोल्हापूर शहरात बसमध्ये, दुचाकी, तसेच कट्ट्यावर बसून थुंकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात हा प्रकार राजरोस सुरु आहे. या विरोधात आज (शुक्रवार) संध्याकाळी कोल्हापूर अँन्टी स्पिट मुव्हमेंटद्वारे बिंदूचौकात थुंकणाऱ्यांच्या विरोधात काम करणारे कार्यकर्ते अगदी भर पावसात देखील हातात बॅनर घेऊन या विषयाचे प्रबोधन आणि जनतेला आवाहन करीत होते. कोणत्याही मोठ्या नेतृत्वाशिवाय काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी थुंकीमुक्त शहराचे स्वप्न प्रत्यक्षात यावे यासाठी या संस्थेने मोठी आघाडी उभी केली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत  आणि शहरातील पानपट्टी दुकानदार देखील या कार्यात स्वतःहून सहभागी झाले होते. तसेच शहरात त्यांनी थुंकीमुक्त कोल्हापूरचा संदेश देणाऱ्या दोन हजार स्टिकर्सचे वाटप करणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी डॉ. दिपा शिपुरकर, नीना जोशी, प्रताप तोडकर, सुनीता मेंगाणे, राहुल राजशेखर, अश्विनी गोपुडगे, डॉ.देवेंद्र रासकर, अभिजित कोल्हापुरे, विद्याधर सोहनी, कल्पना सावंत, संगीता कोकीतकर,अदिती सोहनी, महेश ढवळे, चारूलता चव्हाण, संदेश वास्कर, वर्षा वायचळ, अरुण सावंत विजय धर्माधिकारी, स्वाती कदम यांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.