कोल्हापूर (प्रतिनिधी) : दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी आरोग्यविभागाने कोरोना प्रतिबंधक जनजागृती प्रभावीपणे राबवू प्रसंगी दंडात्मक कारवाई करावी. तसेच पोस्ट कोव्हीड कार्यक्रमही प्राधान्यक्रमाने हाती घ्यावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरफाळ्याच्या दंडामध्ये सवलत योजना राबवा, अशी सुचना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी केली. त्या महापालिकेच्या विविध विभागांचा आढावावेळी बोलत होत्या.या बैठकीला आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री अंबाबाई मंदीर परिसर तसेच मुख्य बाजार पेठामध्ये गर्दी रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष पथके कार्यान्वीत केली जातील असे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. तर शाहू स्मारक भवन येथे पोस्ट कोव्हीड सेंटर लवकरच कार्यान्वीत करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, प्राथमीक शिक्षण सभापती श्रावण फडतारे, प्रभाग समिती सभापती सौ.रिना कांबळे, गटनेते शारंगधर देशमुख, राहुल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.