कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरीकांच्या लसीकरणासाठी ६ जुलैरोजी ६२ हजार ५०० कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. यामध्ये दुसरा डोस राहिलेल्या पात्र नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील नागरीकांना लस उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर असे आम्ही जिल्ह्यातील तीन ही मंत्री सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

पालकमंत्री म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर शहर तसेच सर्व तालुक्यांना त्या तालुक्यातील ४५ वर्षांवरील लस न घेतलेल्या नागरीकांच्या संख्येवरुन तालुकानिहाय लसींचा कोटा ठरविण्यात आला आहे. ४५ वर्षांवरील नागरीकांना प्राधान्याने लस देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरीकांची संख्या १२ लाख ७४ हजार ५४९ इतकी आहे. ५ जुलैअखेर यामधील ८ लाख ५४ हजार ४१४ नागरीकांना पहिला डोस दिला आहे.

कोल्हापूर शहरात कोव्हॅक्सिन लसीचे लसीकरण करण्याचे नियोजन ७ जुलैरोजी महापालिकेने केले आहे. त्यामुळे या कोविशील्ड डोससाठी कोल्हापूर शहरात उद्या ऑनलाईन बुकींग करुन गुरूवारी (८ जुलै) कोविशील्ड डोसचे लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार आहे.

तालुका व शहर उपलब्ध झालेला कोटा —

आजरा – २५००, भुदरगड – ३१००, चंदगड – ३८००, गडहिंग्लज – ४४७०, गगनबावडा – ७००, हातकणंगले – ११ हजार १००, कागल – ४५००, करवीर – ६८९०, पन्हाळा – ३९६०, राधानगरी – ३८४०, शाहूवाडी – ३५५०, शिरोळ – ६२५०, सीपीआर रुग्णालय – ३००, सेवा रुग्णालय, बावडा- ५००, कोल्हापूर महानगरपालिका – ७०७० असे डोस प्राप्त झाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.