पन्हाळा (प्रतिनिधी) : घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी घण घालून निघृण हत्या केली आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील माले येथे आज (शुक्रवार) पहाटे घडली आहे. पती दत्तात्रय पाटील स्वतःहून कोडोली पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पन्हाळा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत पत्नी शुभांगी पाटील (वय ३०) यांचा १० वर्षांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील दत्तात्रय पाटील (वय ३५) याच्याशी विवाह झाला होता. त्यांना ८ आणि ४ वर्षांची दोन लहान मुलं सुद्धा आहेत. गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होता. आज (शुक्रवार) पहाटे सुद्धा दोघांमध्ये वाद झाला. या वादातून पती दत्तात्रय पाटील याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी घन घातला. डोक्यात जोरदार प्रहार झाल्यामुळे पत्नी रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळली. यातच तीचा मृत्यू झाला त्यानंतर दत्तात्रय पाटील स्वतःहून कोडोली पोलिसात दाखल होऊन घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शुभांगी पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कोडोली पोलीस करत आहे.