हमिदवाडा (प्रतिनिधी) : ऊसाचा गळीत हंगाम सध्या जोरात सुरु आहे. ऊस तोडणी वाहतूकीचे काम करणेसाठी बीड, जालना, परभणी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून ऊस तोडणी मजूर आपल्या कुटुंबासह दाखल झाले आहेत. याशिवाय स्थानिक बैलगाड्या, ट्रक, ट्रैक्टर, छकडी हे वाहनधारकही आपल्या वाहनांतून ऊस वाहतूकीचे काम करीत आहेत.

ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे सध्या रस्त्यावर खूप वर्दळ आहे. परंतु, रात्रीच्या वेळी ऊसाने भरलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने काही वेळेस अपघात घडतात. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग, कोल्हापूर आणि मुरगूड पोलिस स्टेशन यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रैक्टर आणि बैलगाड्यांना मागच्या बाजूला मोठ्या आकाराचे परावर्तक (रिप्लेक्टर) लावण्यासाठी आवाहन केले होते. याचाच एक भाग म्हणून कारखान्याने परावर्तक तयार करून घेतले.

हे परावर्तक प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रसाद गाजरे, सहाय्यक परिवहन अधिकारी रोहीत काटकर, मोटार वाहन निरिक्षक विजय भोसले, सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास बडवे तसेच कारखान्याचे व्हाईस चेअरमन बंडोपंत चौगुले, वाहतूक कंत्राटदार यांच्या उपस्थितीत कारखाना गाडी अड्डा येथे ट्रक, ट्रैक्टर, बैलगाड्यांना परावर्तक लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, संचालक मारुती काळुगडे, दत्तात्रय सोनाळकर, माजी संचालक नंदकुमार घोरपडे, सदासाखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासहीत मान्यवर उपस्थित होते.