धामोड (सतीश जाधव) : धामोडचा शनिवारचा आठवडी बाजार तुळशी परीसरातील शेकडो वाडी-वस्तीतील माणसांना एकमेव दैनंदिन जिवनावश्यक वस्तू मिळण्याचे ठिकाण. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली ८ महिने हा बाजार बंद आहे.
याचा परिणाम या बाजारपेठेत येणाऱ्या व्यवसायिकांवर पडत आहेच, शिवाय सामान्य माणसाला गरजेच्या वस्तू वेळेवर मिळत नसल्याने आहे त्यातच गुजराण करावी लागत आहे. सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेचा विचार करून कोरोना दक्षता कमिटी, ग्रामपंचायत प्रशासन यांनी १० ऑक्टोबरपासून बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु बाजारात येताना व्यापारी आणि ग्राहकांना मास्क वापरणे बंधनकारक असेल, कमिटी आणि ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या २ पालातील अंतरावरच व्यापाऱ्यांनी पाल मारणे बंधनकारक असेल, एकाच दुकानासमोर गर्दी होणार नाही, याची जबाबदारी व्यापाऱ्यांबरोबर ग्राहकांनी घेणे गरजेचे आहे.
यावेळी लाईव्ह मराठीने संपर्क केला असता सरपंच अशोक सुतार म्हणाले, लोकांच्या मागणीवरून बाजार सुरू करण्याचा स्थानिक पातळीवर निर्णय घेतला असून वरील सर्व नियमांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे यावेळी उपसरपंच सुभाष गुरव, पोलीस पाटील महादेव फडके, ग्रामविकास अधिकारी एल. एस. इंगळे, कोरोना दक्षता कमिटी आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते.