नागपूर (वृत्तसंस्था) : भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. त्यांच्या नागपूर येथील कार्यालयात यासंबंधी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या नावे धमकीचे फोन आलेत. त्यात गडकरींकडे खंडणी मागण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारानंतर गडकरींच्या कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या नागपूरमध्येच आहेत. त्यातच हे धमकीचे फोन आल्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

नितीन गडकरी यांच्या नागरूप येथील खामला परिसरातील कार्यालयात शनिवारी धमकीचे ३ फोन आले. सकाळी ११.३० च्या सुमारास पहिला फोन आला. काही वेळाने दुसरा व तिसरा फोन आला. त्यात फोन करणाऱ्या व्यक्तीने दाऊदचे नाव घेत गडकरींकडे खंडणीची मागणी करण्यात आली. पैशांची मागणी पूर्ण करण्यात आली नाही तर गडकरींना जीवे मारण्यात येईल, असे धमकी देणारा म्हणाला. दुसरीकडे, काही वृत्तांत हे फोन शुक्रवारी रात्री आल्याचाही दावा केला जात आहे. पण त्याची पुष्टी झाली नाही.

या दूरध्वनीनंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलिसांनीही तातडीने गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धाव घेऊन तपास सुरू केला. एटीएस आणि सायबर पोलिसांचे एक पथकसुद्धा घटनास्थळी पोहोचले आहे. हे सर्वजण फोन करणाऱ्याचा माग काढण्याच्या प्रयत्नांत आहेत. पोलिसांनी या घटनेचा वेगवान तपास करत धमकी देणाऱ्याचा फोन ट्रेस केला आहे. हा फोन कर्नाटकच्या एका भागातून करण्यात आला होता. पोलिस फोन करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नात आहेत.