मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना आता e-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जर दोन महिन्याच्या आत लाभार्थ्यांनी E -KYC केली नाही तर त्यांचे पैसे थांबवले जाण्याची शक्यता आहे, या संधर्भात माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दिली आहे.
ई-केवायसी का आहे आवश्यक?
राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि पात्र महिलांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. तुमच्या माहितीत काही बदल झाल्यास किंवा तुम्ही योजनेच्या अटी पूर्ण करत नसल्यास ते पडताळणीतून स्पष्ट होते. थोडक्यात, ई-केवायसी ही प्रक्रिया योजनेतील योग्य लाभार्थ्यांनाच पैसे मिळतील याची खात्री करते.
ई-केवायसी करणे सोपे आहे!
तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कंम्प्युटरवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ही प्रक्रिया सोपी आणि जलद आहे. तुम्हाला पुढील दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
ई-केवायसी न केल्यास काय होईल?
शासनाच्या परिपत्रकानुसार, ज्या महिला दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी करणार नाहीत, त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे कोणताही अडथळा न येता योजनेचा लाभ सुरू राहावा यासाठी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.