कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील दानवे परिवारातर्फे दिला जाणारा ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार’ यंदा रंगकर्मी संदीप कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. १ मार्च रोजी सायंकाळी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्वास, डोंबिवली फास्ट, डोंबिवली रिटर्न, गैर, टेरिटरी अशा चित्रपटातून तसेच गुंतता हृदय हे, अवंतिका अशा मालिकातून घरोघरी पोहोचलेले डॅशिंग, डायनॅमिक, व्हर्सटाइल संदीप कुलकर्णी हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेते आहेत. संस्काराचे विद्यापीठ साने गुरुजी आणि समाजाला तिमिरातून तेजाकडे नेणारे समाजसुधारक जोतीराव फुले अशा समाजाला प्रेरक सशक्त व्यक्तिरेखा त्यांनी मराठी चित्रपटातून साकारल्या आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

दानवे परिवारातर्फे गेली ३८ वर्षे सांस्कृतिक उपक्रमाद्वारे कोल्हापुरात जयशंकर दानवे या कलाकाराचे स्मरण केले जात आहे. आजपर्यंत दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, सुबोध भावे, प्रशांत दामले, डॉ. गिरीश ओक, भरत जाधव, अविनाश व ऐश्वर्या नारकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर, सचिन पिळगांवकर असे रंगकर्मीं या पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.

याप्रसंगी जयशंकर दानवे यांची कन्या ज्येष्ठ लेखिका जयश्री दानवे यांच्या ‘स्वरांचे चांदणे (गायक-गायिका), अनवट (मराठी संगीतकार), आस्वाद (कथासंग्रह) या ३ पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. कलायात्री पुरस्कार वितरणानंतर संदीप कुलकर्णींच्या प्रकट मुलाखतीतून त्यांच्या अभिनय प्रवासाचा आढावा ताराराणी विद्यापीठातील कमला कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुजय पाटील हे घेणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक जयश्री दानवे, राजदर्शन दानवे, सुधीर पेटकर यांनी दिली आहे.