सांगली (प्रतिनिधी) : मंदिरात चप्पल घालून आल्याच्या वादातून दोन गटात राडा झाला. ही घटना जिल्ह्यातील आटपाडीमधील मासाळवाडी गावामध्ये घडली. यावेळी २ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपा आमदार पडळकर यांचे भाऊ जि. प. सदस्य ब्रह्मदेव पडळकर यांचा समावेश आहे.

मासाळवाडी गावामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला. गावातील मंदिरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवसांपूर्वी काहीजण चप्पल घालून आले होते. त्यावेळी मंदिरात चप्पल घालून का आला? यावरुन वाद झाला होता. यातून मंगळवारी गावातील दोन गटात हाणामारी झाली. या राड्यात त्याठिकाणी असणाऱ्या दोन दुचाकींची तोडफोड करण्यात आली. या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार आटपाडी पोलिसांच्याकडून दोन्ही गटाच्या १२ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.