कोल्हापूर (प्रतिनिधी) : बिनखांबी गणेश मंदिराजवळील ‘ब्राह्मण सभा करवीर’ या संस्थेच्या मंगलधाम या इमारतीमध्ये रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या सहकार्याने गरजूंसाठी सवलतीच्या दरामध्ये कोव्हिड उपचार केंद्र सुरू करीत आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार मराठे आणि माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी दिली.

शहरांमध्ये कोविड संक्रमणाच्या वाढत्या प्रभावामुळे कोविडच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यामध्ये अनेक रुग्णांना लक्षणे नसतात किंवा सौम्य लक्षणे असतात परंतु त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना गृह किंवा संस्थात्मक अलगीकरणांमध्ये राहण्यास सांगितले जाते. शहरातील प्रामुख्याने जुन्या पेठांमध्ये घरे छोटी व कुटुंबे मोठी असल्यामुळे गृह अलगीकरण साध्य होत नसते. तसेच मोठ्या दवाखान्यांमधून दाखल होऊन उपचार घेणे काही रुग्णांना आर्थिक दृष्ट्या शक्य नसते. अशा रुग्णांसाठी अतिशय सवलतीच्या दरामध्ये हे केंद्र सुरू करण्यात येत आहे.

या केंद्रामध्ये केवळ लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाच दाखल करून घेतले जाईल. दाखल केलेल्या कालावधीमध्ये त्यांची दैनंदिन वैद्यकीय तपासणी, नाष्टा आणि भोजन, औषधोपचार, समुपदेशन अशा सर्व प्रकारे त्यांची काळजी घेतली जाईल असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार मराठे यांनी केले.

हे केंद्र सुरू करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष संतोष कोडोलीकर, ज्येष्ठ संचालक डॉ. दीपक आंबर्डेकर, अॅड. विवेक शुक्ल, डॉ. उदय कुलकर्णी,  पंडित धर्माधिकारी, राम टोपकर, अशोक कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.