कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी उद्या (गुरुवारी) १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यात ६ ठिकाणी भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये सहभागी शेतकऱ्यांशी कॉग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी ह्या ऑनलाईन संवाद साधणार आहेत.
यातील एक सभा कोल्हापूरात जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये सायंकाळी ४ वा. मर्यादित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम मार्गदर्शन करणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी त्यांच्या गावातून ऑनलाईन पद्धतीने यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. लोकशाही, संविधान आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने ३ शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे.
कोल्हापूरातील या सभेला आ. पी एन पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. राजू बाबा आवळे, काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच कोल्हापूर जिल्हयातील विधानसभा मतदारसंघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेसह विविध गावा-गावातील शेतकरी या व्हर्चुअल सभेमध्ये सहभागी होणार आहेत.