कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील मंदिरे भाविकांना खुली करण्यासाठी सोमवारी भाजपने राज्यभरात आंदोलन केले. मात्र, केवळ प्रसिद्धीतून आपले अस्तित्व दाखवून भाजपवर निशाणा साधला म्हणजे कुठ्ल्या तरी महामंडळावर वर्णी लावण्यासाठी त्यांचा हा आटापिटा आम्ही समजू शकतो. मंदिरे उघडा, म्हणजे हिंदुत्वाचा ढोंगीपणा, असे वक्तव्य करणाऱ्यांनी जरा आपला इतिहास तपासावा.  युवक काँग्रेसचे बाळकडू प्यायलेल्यांनी आमचा हिंदुत्ववाद बिल्कुल काढू नये, असा पलटवार भाजपने शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्यावर आज (मंगळवार) पत्रकातून केला. 

भाजपने आंदोलनातून गलिच्छ राजकारण करणे थांबवावे, अशी टीका भाजपच्या शंखध्वनी आंदोलनावर संजय पवार यांनी केली होती. या टीकेला भाजपचे जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकातून उत्तर दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, आम्ही कधीच खिशात ‘टोपी’ आणि ‘गमछा’ बाळगून फिरत नाही. अर्धवट माहितीच्या आधारे रेटून बोलायचे हे धंदे त्यांनी आता बंद करावेत. हवेत बोलून आपले अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करुन आपला आणि आपल्या पक्षाचा पाणउतारा करून घेऊ नये. आपले हिंदुत्व किती कडवे आहे, हे आम्ही मागील महापालिका निवडणुकीवेळी पाहिले आहे. त्यामुळे शेखचिल्लीसारखी स्वप्नं पाहणे सोडून दयावे. पक्षीय आंदोलनाला नावे ठेवत आमचा हिंदुत्ववाद काढण्यापेक्षा आपले स्थान, आपली उंची, आपला धर्मसिध्दांत तपासून बघावा व विनाकारण आमच्या वाट्याला जाऊन आपले हसे करुन घेऊ नये. कारण, आमची ‘स्मरणशक्ती’ प्रचंड तीव्र आहे. अन्यथा, समस्त कोल्हापूरकरांना साठा उत्तराच्या कहाण्या ऐकावयास लागतील, असा इशारा पत्रकात दिला आहे.