कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील दाट वस्त्यां तसेच झोपडपट्यांमध्ये सर्व्हेक्षणाची मोहिम नियोजनबध्दरितीने हाती घ्या. या सर्व्हेक्षणाच्या मोहिमेतून एकही नागरिक चुकता कामा नये, अशी सूचना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.
महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या कामाचा आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्हेबएक्स व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. या व्हिडीओ कॉन्फरन्सला उपायुक्त निखिल मोरे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समन्वय अधिकारी व प्रभाग समिती सचिव उपस्थित होते.
आयुक्त कलशेट्टी म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील दाट वस्त्यां तसेच झोपडपट्यांमध्ये पुन्हा एकदा तपासणी करुन सर्व नागरिकांचा सर्व्हे करा. जेणे करुन एकही नागरिक सर्व्हेक्षणापासून वंचित राहणार नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतून नागरिकांचे शंभर टक्के सव्हेक्षण करा. या मोहिमेतील सर्व्हेक्षणाची माहिती तात्काळ ॲपवर भरणे गरजेचे असून या कामासही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे. सर्व्हेक्षणाची माहिती तात्काळ ऑनलाईन भरुन कोल्हापूर महापालिका राज्यात आघाडीवर ठेवण्याचे काम करावे, तसेच या मोहिमेतून सर्व्हेक्षणाबरोबरच आरोग्य शिक्षण आणि जनजागृतीवरही अधिक भर देण्याची सूचना त्यांनी केली.
कोरोनाला रोखण्यासाठी तात्काळ निदान महत्वाचे असल्याने नागरिकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम अधिक काळजीपूर्वक राबवा,अशी सूचनाही त्यांनी केली.