कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात पोलिसांसाठी चार ठिकाणी गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. यातील पोलिस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरी येथील इमारतींचे काम गतीने सुरू आहे. आज (मंगळवार) आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी पोलिस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरी येथील गृह प्रकल्पांच्या कामांची पाहणी केली. तसेच मुख्यालयातील दोन्ही इमारतींचे काम येणाऱ्या दिवाळीपूर्वी पूर्ण करा, अशा सूचना आमदार पाटील यांनी ठेकेदारांना केल्या.


आ. सतेज पाटील यांनी, गृह राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील पोलिसांसाठी एकूण १,७२८ सदनिकांना मंजुरी मिळवली होती. त्यापैकी पोलिस मुख्यालय, लक्ष्मीपुरी आणि इचलकरंजी येथील गृह प्रकल्पांचे काम गतीने सुरू आहे. पोलिसांसाठी सुविधायुक्त सदनिका तयार व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्याची सूचना आमदार पाटील यांनी ठेकेदारांना केली. तसेच कामांची गती आणखी वाढवली जाईल, अशी ग्वाही ठेकेदारांनी दिली.

पोलिस मुख्यालयातील दोन्ही इमारती १७ मजली असून, त्या काँक्रीट स्ट्रक्चरपासून बनवल्या जात आहेत. यात दगड, विटांचा वापर होत नाही. दोन्ही इमारतीत प्रत्येकी १०२ सदनिका आहेत. प्रत्येक सदनिका ५२५ स्क्वेअर फुटांची आहे. फरशीपासून ते लाईट फिटिंगपर्यंत सर्व सुविधा असलेली मॉडेल सदनिका तयार करण्याची सूचना आमदार पाटील यांनी ठेकेदारांना केली आहे.

त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत एक सदनिका तयार केली जाणार आहे. प्रत्यक्ष पोलिसांच्या कुटुंबीयांकडून त्याची पाहणी करून सुविधांबद्दल सुधारणा केल्या जातील, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.

तसेच पोलिस मुख्यालय – २०४, लक्ष्मीपुरी – ९६, इचलकरंजी – २००, नंदवाळ – २१६ अशा सदनिका बांधण्यात येणार आहेत.

यावेळी माजी महापौर स्वाती येवलुजे, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक राजेंद्र माने आदी उपस्थित होते.