कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वच्छता अभियानातून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज पंचगंगा घाटावर हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. तसेच पंचगंगा घाट येथील भाजी आणि फळविक्रेत्यांना मास्क, हॅण्डग्लोज वापरणे आणि सामाजिक अंतर ठेवण्याचे प्रबोधनही केले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी फळ आणि भाजीविक्रेत्यांनी मास्क व हॅण्डग्लोज वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कोठेही न थुंकणे, सॅनिटायझर वापरणे आणि गर्दीत न करु देणे या गोष्टींचे महत्व आयुक्तांनी सांगितले. तर भाजी तसेच फळ विक्रेत्यांनी स्वत: मास्क व हॅण्डग्लोज वापरणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असून भाजी अथवा फळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाही मास्क असल्याशिवाय आणि सामाजिक अंतराचे पालन केल्याशिवाय फळे वा भाजीपाला देऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली,
तसेच मास्क, हॅन्डग्लोज ज्या भाजी विक्रेत्यानी वापरले नाहीत, त्यांना दंड करण्याच्या सुचना मार्केट इन्स्पेक्टर गीता लखन यांना दिल्या. त्यानुसार त्यांनी मास्क, हॅन्डग्लोज न वापरणा-या पाच भाजी विक्रेत्याकडून 800 रुपयांचा दंड वसूल केला. आयुक्त कलशेट्टी यांनी रंकाळा तलाव परिसरातील पत्तोडी घाट आणि जयंती नाला येथील स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. माझे कुटूंब माझी जबाबदारी, पंतप्रधान स्वनिधी सहाय्य योजना सर्व प्रभागात यशस्वीरित्या राबविण्याच्या सुचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या.
यावेळी महापालिकेचे उपआयुक्त निखिल मोरे, सहा.आयुक्त् चेतन कोंडे, संदीप घारगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शाखा अभियंता आर.के.पाटील, रामचंद्र काटकर, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर, आरोग्य निरिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.