मुंबई (प्रतीनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटी येथील बंडखोर शिवसेना आमदारांना परत फिरण्याचे आवाहन केले आहे. मला काळजी वाटते. अजूनही वेळ गेली नाही. समोर येऊन बोला, आपण मार्ग काढू, अशा शब्दात ठाकरेंनी आमदारांना आश्वस्त केले आहे. त्यामुळे बंडखोर आमदार आता काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला एक आठवडा होत आला, मात्र बंडखोरांसोबत कुठलीही सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त आलेले नाही. त्यानंतर ठाकरे सरकारकडून त्यांचे परतीचे दोर कापण्यास सुरुवात झाली होती. ठाकरे सरकारकडून नऊ मंत्र्यांकडील खाती काढून घेण्यात आली, तर त्याआधीच १६ बंडखोर आमदारांना कारवाईबाबत नोटीस पाठवण्यात आली होती.

एकीकडे संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी नावे घेऊन घेऊन आमदार-मंत्र्यांवर हल्ला चढवला आहे, तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी सामोपचाराने बोलत पुन्हा एकदा हात पुढे केल्याचे चित्र आहे. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मानसन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.