मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक -५ अंतर्गत गाईडलाईन्स जारी करुन देशातील चित्रपटगृहे १५ ऑक्टोबरपासून उघडण्यास परवानगी दिली आहेत. मात्र महाराष्ट्रातील चित्रपटगृहे आतापर्यंत बंद होती. पण आता राज्यातील चित्रपटगृहे २४ तासांच्या आत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर चित्रपटांचे नियमित शोज ६ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहेत. या संदर्भात चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

केंद्र सरकारच्या परवानगीनंतर राज्यातील चित्रपटगृह कधी सुरु करणार यांसदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना काही दिवसांपूर्वी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, महाराष्ट्र सरकार चित्रपटगृह सुरु करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. चित्रपटांसाठी, नाट्यगृहासाठी नवरात्र, दसरा, दिवाळी हा मौसम असतो, त्यामुळे चित्रपगृह सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आम्ही यासंदर्भात सकारात्मक असून याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृह बंद असल्यामुळे थिएटर मालकांवर आर्थिक संकट कोसळले होते. आता चित्रपटगृहे सुरु होणार असल्याने थिएटर मालकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

चित्रपटगृहे सुरू करण्यासंदर्भात नियमावली –

१) केवळ ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक. २) आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग सक्तीचे. ३) राखीव आसनव्यवस्था ठेवता येणार नाही. ४) प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर  पुरवण्यात यावे. ४) चित्रपटगृहात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्क्रिनिंग आवश्यक. ५) चित्रपटगृहांमध्ये फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश.