कागल (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फार मस्ती आली आहे, असा पुनरुच्चार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. सत्ता गेल्यामुळे भ्रमनिरास झालेले पाटील ऊठसूट राज्यातील नेत्यांना तंब्या देऊन स्वतःचं हसं करून घेत आहेत,  अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

कागलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांनी तंबी दिल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांना मस्ती आल्याचा पुनरुच्चार करीत मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील किती फाटके आहेत आणि त्यांच्याकडे किती माया आहे, हे मला चांगलंच माहीत आहे. यापूर्वी पश्चिम बंगालच्या निकालावर बोलल्याबद्दल त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना तुम्ही जामिनावर सुटलेले आहात, तुम्ही निर्दोष झाला नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर अशोकराव चव्हाण यांनाही त्यांनी औकात सांगितली होती. आणि आता तर त्यांनी अजितदादांना उद्देशून आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत, तोंड सांभाळून बोला, असे वक्तव्य केले आहे.

मुश्रीफ पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटील विनाकारण बेजबाबदार वक्तव्य करून स्वतःचे हसे करून घेत आहेत. त्यांनी सांभाळून बोललं पाहिजे. परवा एका वृत्तपत्रात कार्टून छापून आलं होतं. त्यामध्ये चंद्रकांत पाटील रात्री झोपेतच पलंगावरून खाली पडले आहेत आणि सरकार पडलं… सरकार पडलं…असं म्हणू लागले, अशा आशयाचं व्यंगचित्र रेखाटलं होतं. ते योग्यच आहे. खासदार विनायक राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलेल आहे. त्यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज आहे.

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकालाला सात वर्षे पूर्ण झाली, याबाबत प्रतिक्रिया देत असताना, आपला भारत देश आजही पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांच्या पुण्याईवर चाललेला आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. एबीपी माझा न्युज चॅनेलने केलेल्या सर्वेप्रमाणे नरेंद्र मोदींनी संकट काळात कशा पद्धतीने तोंड दिलेलं आहे. देशाची इब्रत या जगामध्ये कशी कमी झालेली आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कामगिरी किती उजवी आहे व त्यांनी केलेले काम किती चांगले आहे, हे सुद्धा एबीपी माझाने दाखविलेल आहे. याचा राग चंद्रकांत पाटलांना आला असावा व त्यामुळे त्यांनी संजय राऊत यांच्याबद्दल असं वक्तव्य केलं असावं, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.