कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासन तसेच जिल्हा प्रशासनाने काढलेल्या अनलॉकच्या परिपत्रकानुसार व्यापार बंदला दोन महिने उलटून गेले आहेत. शासनाच्या ४ जून २०२१ रोजीच्या नवीन परिपत्रकातील चुकीच्या नियमाप्रमाणे या आठवड्यात देखील व्यापार सुरु होऊ शकलेला नाही. मात्र, आता दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी अन्यथा उद्या (बुधवार) रस्त्यावर उतरण्याचा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत आज (मंगळवार) बैठक पार पडली. बैठकीत ठरल्याप्रमाणे बुधवार दि. ९ जून रोजी कोल्हापूर शहरातील जीवनावश्यक व अत्यावश्यकमधील सर्व सेवा दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत व्यापारी आपापल्या दुकानाबाहेर व्यापराच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून रस्त्यावर उतरणार आहेत. या संदर्भात उद्या सकाळी १० वाजता गुजरी कॉर्नर, चोरगे मिसळजवळ जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.