कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नितीन शिवाजी पोवाडी याच्या विरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बुधवार दि. १४ रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. पिडीत महिलेने या घटनेची वर्दी येथील पोलिसांत दिली आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शिवाजी पोवाडी हा अनेक दिवसांपासून पिडीत महीलेचा पाठलाग करत होता आणि त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. 14 मे रोजी सायंकाळी आठवडी बाजारात जात असताना, त्याने पिडीत महिला आणि त्यांच्या मुलीचा पाठलाग केला. त्याने त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले आणि मुलीचा चोरून मोबाईलवर फोटो काढला.

जेव्हा या कृत्याबद्दल जाब विचारण्यात आला, तेव्हा नितीन पोवाडीने अपशब्द वापरत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मुलीने त्याचा मोबाईल तपासला असता, त्यामध्ये इतरही अनेक महिलांचे चोरून काढलेले फोटो आढळून आले. या प्रकारानंतर पीडित महिलांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करीत आहेत.