कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कोणत्याही क्षेत्रात झोकून दिल्याखेरीज करिअरमध्ये यशस्वी होता येत नाही,’ असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले.

येथील शासकीय तंत्रनिकेतन, हस्तकला विभाग व वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने फॅशन ज्वेलरी आणि मेटलवेअर कास्टिंग टेक्निशियन या दोन अभ्यासक्रमांचे उदघाटन भरत ओसवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सेंटर ऑफ एक्सलन्स इन जेम्स अँड ज्वेलरी विभागात झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘सराफी व्यवसाय असो अथवा कोणतेही क्षेत्र आज तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्ये विकसित केल्यास त्यामध्ये नक्कीच यश मिळेल. जबाबदारीने कामे करा आणि आत्मनिर्भर बना. कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवले.’

हँडिक्राफ्ट सर्व्हिस सेंटरचे सहायक निदेशक चंद्रशेखर सिंग म्हणाले, ‘या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही जरुरी ज्ञान मिळवा आणि स्वतः वस्तूंची निर्मिती करा. हस्तकला विभागाच्या वतीने सर्व प्रकारचे सहयोग करू. अजूनही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी प्रशिक्षण घेताना प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क, सॅनिटायर, हँडग्लोज आणि सामाजिक अंतर पाळत योग्य ती काळजी घ्यावी.’
प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी सांगितले, उद्योगधंदे व शिक्षणसंस्था यांची योग्य सांगड घालून अशा अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे. यामधून तंत्रशुद्ध शिक्षण घेतल्यास रोजगाराची मोठी संधी आहे”
समन्वयक शशांक मांडरे यांनी सूत्रसंचलन करताना बॅचसंबंधी अधिक माहिती दिली.

रितेशकुमार यांनी स्वागत व प्रास्ताविकात हँडिक्राफ्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. मनोहर मीना यांनी आभार मानले.
यावेळी विभागप्रमुख किशोर मेश्राम, जिल्हा सराफ संघाचे राजेंद्र ओसवाल, अशोक झाड, तुकाराम माने, संजय चोडणकर, कुमार दळवी, प्रिया जाधव आदी उपस्थित होते.