सरवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील  सरवडे येथील दूधगंगा नदीपात्रात अंदाजे ३५ ते ४० वर्षाचा पूर्णतः सडलेला आणि लोखंडी तार, दोरीने दगडाला बांधलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह पूर्णतः सडलेला असल्याने पोलीसांनी जागेवरच पंचनामा केला. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील वंदना गुरव यांनी राधानगरी पोलीसांत दिली आहे.

सरवडे येथील दूधगंगा नदीपात्रात मांगेवाडी हद्दीत शेतातील लोकांना पाण्यात तरंगणारा मृतदेह दिसला. याची खबर पोलीस पाटील वंदना गुरव यांना देण्यात आली. हा मृतदेह प्लास्टिकच्या बारदानात गुंडाळून कंबर, छाती, खांद्याला दोरी आणि लोखंडी तार तसेच मोठमोठी दगडे बांधलेल्या अवस्थेत होता. हा मृतदेह पूर्णतः सडल्याने डॉक्टरांच्या पथकाने जागेवरच पोस्टमार्टम केले. डॉक्टर आणि पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह पुरुषचा साधारण ३५ ते ४० वयाचा असल्याचे सांगितले. तरीही पुरुष की स्त्री ठरवणे अवघड झाल्याने मृतदेहाचे काही अवशेष पुढील तपासासाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले.

पोलिसांनी हा खून किंवा घातपाताचा संशय व्यक्त करुन प्रेताची विल्हेवाट लावण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केला असल्याचे सांगितले. तसेच ८-१०दिवसात कोणतीही मिसिंग तक्रार नोंदवली नसल्याचे सांगितले. ही घटना गंभीर असून याबाबत कोणाला माहिती द्यायची असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीसांत झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.