मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या ४० वर्षात भाजप प्रतिकूल परिस्थिमध्ये पक्ष वाढवला. कुणाचेही पाय न चाटता स्वत:च्या हिंमतीवर पदे मिळवली. पण मला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक बदनाम केले. विविध प्रकरणात गोवले. म्हणून फडणवीसांमुळेच मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहे. माझी भाजप पक्षाबद्दल आणि केंद्रीय नेतृत्वाबद्दल तक्रार नाही, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.

ते म्हणाले, बहुजन समाजाचा मुख्यमंत्री म्हणून मी पुढे आल्यानंतर फडणवीस यांनी माझ्याविरोधात विविध चौकशा लावल्या. खोट्या विनयभंगाच्या खटल्यात अडकवले. हे सर्व सहन करण्यापलिकडे गेले. त्यामुळे मी आणि माझी मुलगी भाजप सोडतोय. पण सून खासदार रक्षा भाजपमध्येच राहणार आहे. माझ्यासोबत तूर्त तरी भाजपचे आमदार, खासदार येणार नाहीत. मला राष्ट्रवादीने कोणत्याही पदाचे आमिष दाखवलेले नाही.