कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेले काही दिवस भोगावती सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या निमित्ताने भोगावती पंचक्रोशीतील वातावरण चांगलंच तापलं होतं. या तोफा 19 नोव्हेंबरला थंडावल्या आणि 20 नोव्हेंबर रोजी या कारखान्याच्या मतदारांनी दिलेला कौल पुढे आला आहे. त्यानुसार सत्ताधारी गटाने पुन्हा एकदा आपली सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील, शेकापचे संपतराव पवार-पाटील यांच्या सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने 25 पैकी 24 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विरोधी संस्थापक कौलवकर आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.


भोगावती’साठी रविवारी चुरशीने 86.33 टक्के मतदान झाले. सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी आघाडी, भाजप, शिवसेना, शेकापची शिवशाहू परिवर्तन आघाडी व संस्थापक कै. दादासाहेब पाटील आघाडी रिंगणात उतरले होते. यात सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने बाजी मारली असून सत्तारूढ आघाडीचा एक अपवाद वगळता सर्वच उमेदवार 500 ते 3,500 मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे भोगावती खोऱ्यात आता ठिक- ठिकाणी गुलाल आणि डॉल्बीचा दणदणाट सुरु आहे.