म्हालसवडे (प्रतिनिधी) : तुळशी नदीपात्रावरील सहा बंधाऱ्यांना शेतीसाठी पाणी अडवण्यासाठी बरगे घालण्यात आले आहेत. तुळशी नदीतून अद्यापही पावसाचे नैसर्गिक पाणी वाहात आहे. या मुबलक पाण्याचा शेतीसाठी वापर करण्याकरिता पाटबंधारे विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

पाटबंधारे विभागातर्फे वतीने धामोड येथील तुळसी धरणातील पाण्याचे शिस्तबध्द रित्या नियोजन करण्यात आले आहे. राधानगरी तालुक्यातील धामोडपासून करवीर तालुक्यातील कसबा बीडपर्यंतच्या २२ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीकरिता तुळशी धरणातील पाण्याचा वापर करण्यात येतो. या वर्षी तुळशी धरणांमध्ये पावसाळ्यात साठवलेले पाणी अद्याप नदीपात्रात सोडलेले नाही.

नदीवरील आरे, कसबा बीड, कांचनवाडी, घुंगूरवाडी, चांदे व कोते या बंधाऱ्याला सध्या बरगे घालण्यात आले आहेत. काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने शेतीसाठी पाण्याची आवश्यकता लागणार आहे. या परिसरातील शेतकरी नदीकाठावर विद्युत पंप बसवू लागले आहेत. याकरिता पाटबंधारे विभागाच्या भाटणवाडी कार्यालयामार्फत तुळशी नदीवरील बंधाऱ्यांना बरगे घालून नैसर्गिक पाण्याचा पुरेपूर वापर करुन घेतला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जी. एस. सावेकर यांनी दिली.