पेठ वडगाव (प्रतिनिधी) : पेठवडगाव व परिसरातील प्रमुख रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, त्याचा वाहनधारक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे वडगाव परिसरातील रस्त्यावरचे डांबर निघून गेल्यामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या वडगाव परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्यामुळे ऊस वाहतूक सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना या खड्डे पडलेल्या रस्त्यावरुनच वाहतूक करावी लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. छोट्या-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते असे विचारण्याची वेळ आली आहे.

शासनामार्फत दरवर्षी नवीन रस्ते तयार केले जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडतो; परंतु दरवर्षी अवघ्या सहा ते आठ महिन्यांत रस्ते खराब होतात. हलक्या प्रतीचे डांबर व खडी वापरल्यामुळे ठिकठिकाणी रस्ते उखडले जात आहेत. या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी व ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. वाठार ते इचलकरंजी तसेच वडगाव ते कुंभोज या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत.