मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सीमेंवर तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर काही फेक न्यूज व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज चांगलाच व्हायरल होतोय तो म्हणजे, देशातील एटीएम दोन ते तीन दिवसांपासून बंद राहणार आहेत..? तुम्हालादेखील हा मेसेज आला असेल तर आत्ताच सावध व्हा. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने या मेसेजमागचे सत्य समोर आणले आहे. पीआयबीनुसार, व्हायरल होत असलेला व्हॉट्सअॅप मेसेज खोटा असून एटीएमवर कोणताही परिणाम होणार नाहीये.

व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आला होता की, देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवस बंद असणार आहेत. पण पीआयबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित मेसेज हा खोटा असून एटीएम सुरळीत चालु असणार आहेत. व्हायरल झालेल्या मेसेजनंतर अनेकांनी एटीएमबाहेर रोख रक्कम काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या. त्यामुळं पीआयबीने लोकांना अवाहन केलं आहे की, चुकीची माहिती पसरवली जात असून अशा प्रकारच्या फेक न्यूज पसरवू नका.