कोल्हापूर (प्रतिनिधी) : नाष्टा सेंटरमध्ये सॅंडविच आणि वडापाव खाण्यास मनाई केल्याच्या रागातून चौघांनी केलेल्या मारहाणीत विक्रेता आणि त्याचा कामगार हे दोघे जण गंभीर जखमी झाले. उमेश अरुण जाधव (वय 30,  मूळ रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ, सध्या रा. राजारामपुरी 8 वी गल्ली), आकाश मारुती बोडके अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी उमेश जाधव यांनी सुरज कांबळे (रा. राजेंद्रनगर) याच्यासह चौघांना विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे

पोलीसांकडून समजलेली माहिती अशी, उमेश जाधव यांचे शाहूपुरी दुसऱ्या गल्लीमध्ये नाष्टा सेंटर आहे. याठिकाणी गुरुवारी सायंकाळी आलेल्या चार तरुणांनी सॅंडविच वडापाव घेतला. ते चौघेजण या नाष्टा सेंटरमध्ये बसून वडापाव खाऊ लागले. मात्र, उमेश जाधव यांनी त्या चौघांना याठिकाणी बसून नाष्टा करु नका असे त्यांना सांगितले.

या रागातून चौघांनी उमेश जाधव आणि त्यांचा कामगार आकाश बोडके या दोघांना नाष्टा सेंटरमधील स्टीलच्या झाऱ्याने बेदम मारहाण केली. त्यात उमेश जाधव आणि आकाश बोडके हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी उमेश जाधव यांनी सुरज कांबळे आणि त्याचे तीन साथीदार अशा चौघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.