कडगाव (प्रतिनिधी) : सोळा वर्षांपूर्वी कामाची सुरुवात करून ठेवली. मात्र, बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनीचा झाडा, बेटांचा, घरांचा मोबदला न देता पुन्हा 2024 झाली काम चालू केले. एखाद्या प्रकल्पाचे काम पाच वर्षात पूर्ण केले नाही तर या कामाची लागणाऱ्या जमिनीची पुन्हा संपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. मात्र, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून काम पूर्ण करण्याचा यंत्रणेचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला. यावेळी शेतकऱ्यांनी अंतुर्ली तलावाच्या साईटवरून यंत्रणा हलवून काम बंद पाडले आहे.

यावेळी बाधित शेतकरी एकत्रीत येवून गावात काँ. शिवाजी गुरव यांना निमंत्रक म्हणून त्यांच्या उपस्थितीत मेळावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शिवाजी गुरव यांनी, जर 2024 साली वाहिवाटीचे पंचनामे करून कामाची सुरुवात केली असेल तर नवीन 2013 च्या भूमी संपादन कायद्याप्रमाणे जमिनीचा खासगी वाटाघाटीने बाजारभावाच्या चारपट रक्कम दिली पाहिजे किंवा रेडी रेखनरच्या पाचपट तसेच फळझाडांची किंमत त्या झाडांच्या फळाच्या उत्पन्नाच्या प्रमाणात त्या झाडांचे वय लक्षात घेऊन किमती केल्या पाहिजे.

तसेच 2013 च्या कायद्याप्रमाणे मोबदला मिळाल्यास शेतकरी विकासाला विरोध करणार नाहीत. शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, कायमची पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन प्रकल्पासाठी द्यावी लागते त्यामुळे योग्य मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असल्याचे सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांना भीती घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याने उपोषणाचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. तर गारगोटी तहसील कार्यालयाच्या दारात दिनांक 14 मे रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याचे निवेदन आमदार आबिटकर, जिल्हा अधिकारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी, प्रांताधिकारी आजरा- भुदरगड, पोलीस निरीक्षकांना दिल्या आहेत.