कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार धक्का बसला आहे. सांगलीतील राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे नक्की झालंय. त्यामुळं सांगलीत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.

७ ऑक्टोबरला मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत शरद लाड यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. शरद लाड हे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जी. डी. बापू लाड यांचे नातू आहेत. तर शरद लाड यांच्या भाजप प्रवेशामुळे आमदार जयंत पाटलांना सर्वात मोठा धक्का बसलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. शरद लाड यांच्या पक्ष प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसू शकते. तर लाड यांचे स्थानिक पातळीवर जनसंपर्क मोठा असल्याने याचा फायदा भाजपला होऊ शकतो.