नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकमधला तणाव वाढतोच आहे. त्यातच आता पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालिदची हत्या झाली आहे.सैफुल्लाह हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर होता. सोबतच भारतातल्या अनेक हल्ल्यात त्याचा सहभागही होता. सैफुल्लाहची अज्ञाताने गोळ्या झाडून हत्या केल्याचं सांगितलं जातंय.

सैफुल्लाह लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर होता. सैफुल्ला खालिद हा सैफुल्ला कसुरी या नावानेही ओळखला जायचा. हाफिज सईदचा खूप जवळचा मानला जायचा. जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर आणि टीआरएफच्या दहशतवादी कारवायांचा मुख्य चालक होता. सैफुल्लाह पूर्वी नेपाळमध्ये राहत होता, तो अलिकडेच पाकिस्तानला गेला होता. तो काठमांडूमधील पाकिस्तानी दूतावासाच्या संरक्षणाखाली राहत होता. लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी कारवायांसाठी केडर उभे करणं तसेच आर्थिक मदत पुरवण्याचं काम तो करायचा.

भारतामधल्या तीन दहशतवादी हल्ल्यात सैफुल्लाहचा हात होता. यामध्ये रामपूर येथे 2001 साली झालेला सीआरपीएफ कँपवरील हल्ला, 2005 साली झालेल्या बंगळुरू येथील इंडियन सायन्स काँग्रेसवर झालेल्या हल्ला तसेच 2006 साली झालेल्या नागपुरातील संघाच्या मुख्यालयावरील हल्ल्यातही सैफुल्लाचा सहभाग होता.