कुरुंदवाड (प्रतिनिधी) : हातकणंगले लोकसभा मतदार संघाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कुरुंदवाड शहरामध्ये देखील चौकाचौकात कट्यावर निवडणुकीची चर्चा पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) निवडणुकीच्या चर्चेतून वाद झाल्याची घटना पालिका चौकात घडली.

नेहमीच गजबजलेल्या पालिका चौकात तत्कालीन लोकप्रतिनिधींनी आमच्या भैरववाडीमध्ये काय कामे केली आहेत ? असा सवाल चर्चेत केला. यावेळी लगतच्या गावचे नेते (सर) टोपननाव असलेले धैर्यशील माने गटाच्या एका जेष्ठ व्यक्तीने चक्क त्या व्यक्तीला याबाबत जाब विचारला आणि काही वेळातच त्याचे रूपांतर भांडणमध्ये झाले. हे भांडण मिटवण्याकरिता परिसरातील नागरिक जमा झाले. परंतु, हा वाद इतका वाढला की दोन्हीकडून एकेरीवर भाषा येऊ लागली. शेवटी भैरववाडीच्या नागरिकाने माघार घेतली आणि वाद मिटला.

मात्र, कुरुंदवाड शहरालगत असलेल्या भैरववाडी गावात गटारींची अवस्था दयनीय असून सर्व सामान्य नागरिक म्हणून सदरचा नागरिक संतापला. त्यात त्याचे काय चुकले ? वाद करून उमेदवाराला मते मिळत नाहीत. संबंधित सरांनी जर सामोपचाराने आणि गोडीगुलाबीने विचारून धैर्यशिल माने यांच्या कामाची माहिती दिली असती आणि न झालेल्या कामाबाबत आश्वासन दिले असते, तर हा वाद झालाच नसता अशी चर्चा पालिका चौकात सुरू होती.