गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) बारा बलुतेदारांना व्यवसायिक प्रशिक्षण व व्यवसायाच्या आर्थिक मदतीसाठी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ‘ही नाविन्यपूर्ण योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. याचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम या योजनेचा कॅम्प समरजितसिंह आपल्या दारी उपक्रमांतर्गत गडहिंग्लजमध्ये घेतली असल्याची माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.


गडहिंग्लज येथे बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात सहकारमहर्षी स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त ‘चला संकल्प करुया 75 हजार लाभार्यांना लाभ देऊया’ उपक्रमांतर्गत ‘समरजितसिंह आपल्या दारी’ अभियान अंतर्गत पाचव्या कँपच्या शुभारंभवेळी ते बोलत होते.यावेळी विविध योजनांच्या लाभासाठी 1396 लाभार्थ्यांनी नोंदणी केली. यावेळी त्यांनी शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे व साहित्याचे वाटपही केले.


यावेळी बोलताना घाटगे म्हणाले, शासनाच्या योजनांपासून वंचित लोकांनी नेत्यांच्या दारात जायचे नाही तर नेत्यांनी अशा लोकांच्या दारात जाण्यासाठीच राज्यात सर्वप्रथम समरजितसिंह आपल्या दारी अभिनव उपक्रम राबविला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना त्यांच्या दारात जाऊन दिला आहे.

त्यामुळे कागल-गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ देताना गेल्या पंधरा वर्षांपासून सुरु असलेली एजंटगिरी मोडून काढली असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.


यावेळी आण्णासाहेब पाटील,अनिता चौगुले, गणपतराव डोंगरे, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील,सरपंच अनुप पाटील,परमेश्वरी पाटील,शाहूचे संचालक सचिन मगदूम, प्रीतम कापसे,सुदर्शन चव्हाण,रविंद्र घोरपडे,शैलेश कावणेकर,भिमराव कोमारे,शहाजी पाटील आदी उपस्थित होते.