मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूच्या संसर्ग अद्याप कायम आहे. कोरोनाचे विषाणू नवीनवीन व्हेरियंट समोर येताना दिसत आहेत. त्यातच आता गुलाबी थंडीचा चाहूल लागली असताना आता डेंग्यूसारखे विषाणूजन्य आजार बळावताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढली आहे. एकीकडे कोरोना विषाणू अधिक धोकादायक बनत आहे, तर दुसरीकडे डेंग्यूसारखा व्हायरल आजार डोके वर काढत आहेत.

अशावेळी लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे की कोरोनाची हे समजणे कठीण जात आहे. डेंग्यू आणि कोरोना हे दोन्ही विषाणूजन्य आजार आहेत. ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी आणि अंगदुखी यांसारखी लक्षणे दोन्ही रोगांमध्ये सामान्य आहेत. मात्र यामध्ये काही फरक देखील आहे. अमेरिकन सीडीसीनुसार सतत उलट्या होणे, धाप लागणे, अशक्तपणा, थकवा, अस्वस्थता, यकृताचा आकार वाढणे, प्लेटलेटची संख्या वेगाने वाढणे, शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव होणे ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत.

कोरोनाची लक्षणे डेंग्यूपेक्षा वेगळी आहेत. यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत सतत दुखणे, ओठ किंवा चेहरा निळा पडणे, घशात घरघर, भ्रम होणे, झोपे संबंधित समस्या ही प्रमुख लक्षणे आहेत. दरम्यानच्या काळानुसार या लक्षणांमध्येही बदल होत आहे; परंतु सध्या सोबत डेंग्यूही सध्या कोरोनासोबत बळावत आहे.