मुंबई ( वृत्तसंस्था ) उद्घाटन रखडलेला लोअर परळ येथील डिलाईन रोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रात्री लोकहितासाठी सुरू केला. यानंतर राज्य सरकारने आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, डिलाईन रोडची 100 ते 120 मीटरची लेन 10 दिवसांपासून तयार असूनही बंद ठेवण्यात आली होती. कारण घटनाबाह्य खोके सरकारला उद्घाटनाला वेळ नाही. तीन लेन बंद ठेवल्याने डिलाईन रोडच्या आजूबाजूला राहाणाऱ्या रहिवाशांना आणि काम करणाऱ्या लोकांना त्रास होत होता.

डिलाईन रोडची ही दुसरी लेन 10-15 दिवसांपासून तयार होती. रंगरंगोटी झालेली, लेन मार्किंगही झालेली. बीएमसीचे काही पॅरामिटर्स असल्याने लोड टेस्टिंगसाठीही आम्ही थांबलेलो. हे सगळे झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून बीएमसी थांबलेली. म्हणून आम्ही अभिमानाने उद्घाटन केल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच गुन्हे दाखल झाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, जे गुन्हे दाखल केले त्यावर आपली एकच प्रतिक्रिया असून मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी लढत असताना जर माझ्यावर गुन्हे दाखल होत असतील तर माझ्या आजोबांना माझा अभिमान असता, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.