कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या महसूलमध्ये वाढ झाली पाहिजे,  हेच टार्गेट ठेवून काम करा. अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केल्या. ते उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते.

 

ना. देसाई म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याला गोवा राज्यासह अन्य राज्यांची सीमा लागून आहे. त्यामुळे गोवा येथून होणारी चोरटी मद्य  वाहतूक रोखण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा. तसेच उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या आधारे अवैध मद्यविक्री, हातभट्टीची दारू यासारख्या व्यवसायांना आळा घालण्यासाठी प्रसंगी विभागाच्यावतीने कठोर पावले उचलली जातील.

प्रभारी पोलीस अधिक्षक संध्याराणी देशमुख म्हणाल्या, सप्टेंबरअखेर विभागाला ८० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. या वर्षातील ३५८ कोटींचे टार्गेट पूर्ण करणे कोरोनामुळे विभागाला शक्य होणार नाही. राज्य शासनाने या टार्गेटमध्ये कपात करून १८० कोटींचे टार्गेट द्यावे. अशी मागणी देशमुख यांनी ना. शंभूराजे देसाई यांच्याकडे केली. मात्र, ही मागणी फेटाळून लावत महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना ना. देसाई यांनी केल्या.

या आढावा बैठकीला विभागीय आयुक्त पवार, प्रभारी पोलीस अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्यासह विभागातील अधिकारी उपस्थित होते.