देवगड (प्रतिनिधी) : देवगड येथे एका घरामध्ये टाईल्स बसविण्याचे काम सुरु होते. यावेळी पोटमाळ्याच्या तुटलेला ब्लॉकचा तुकडा अंगावर पडल्याने अवधेश राजभवन कुमार (वय 31, मूळ रा. रणडोली, उघडपूर जि. सुलतानपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. जामसंडे टिळकनगर, ता. देवगड) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी) दुपारच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड येथील प्रदीप मांजरेकर यांच्या मांजरेकर नाका येथील घरी टाईल्स बसविण्याचे काम सुरु होते. अवधेश राजभवन कुमार हा काम करीत असताना अचानक पोटमाळ्याच्या तुटलेल्या ब्लॉकचा तुकडा त्याच्या अंगावर कोसळला. या घटनेत उजव्या पायाच्या मांडीवर आणि पोटाच्या उजव्या बाजूला त्याचा मार लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

परंतु, त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबतची खबर सुखराम बुखल गौतम (वय 30, मूळ रा. नानीमोड सुलतानपूर, जि. उत्तरप्रदेश, सध्या रा. जामसंडे टिळकनगर) यांनी देवगड पोलिसात दिली आहे. देवगड पोलिसांनी याची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.