कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) महिलेची छेडछाड करुन शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अकिवाट (ता. शिरोळ) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार याच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पिढीत महीलेने याबाबतची कुरुंदवाड पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बैरागदार याला अटक केली आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी बैरागदार हा माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी देखील विनयभंगाच्या तक्रारी होत्या. मात्र परस्पर मिटविले जात असल्याने पोलिसांपर्यंत हा वाद गेला नव्हता. मात्र रविवारी (दि.25) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी महीलेचा हात ओढून संशयित आरोपी बैरागदार याने तू मला आवडतेस म्हणत शरीर सुखाची मागणी करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. शिवाय तुला मी दररोज त्रास देणार, तुझ्या नवर्याला मारहाण करणार’असे धमकी दिल्याचे पिढीत महीलेने फिर्यादीत म्हटले आहे.

या तक्रारीनंतर आरोपी बैरागदार याच्यावर कारवाई करत कुरुंदवाड पोलिसांनी त्याला अटक केल्याने अकिवाटस परीसरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक साबळे करीत आहेत.