शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान या योजनेअंतर्गत ६१ कोटी ३५ लाख रुपयांच्या भुयारी गटर आणि मलनिस्सारण प्रकल्पाचा शुभारंभ आमदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. शहराच्या विकासात सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे नागरिकांचे आरोग्य. स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा मिळावा म्हणून पेयजल योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.याचबरोबर शहरातील नागरिकांचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी भुयारी गटर योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.
मलनिस्सारण केंद्र उभारून शहरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्याचा हा ऐतिहासिक निर्णय ठरेल, या योजनेसाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या ६१ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीमुळे शहरातील आरोग्याशी निगडित अनेक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागतील. यामुळे शहरातील रस्त्यांवरील सांडपाणी, दुर्गंधी आणि अस्वच्छता यांचा त्रास कमी होईल. नागरिकांना आरोग्यदायी, स्वच्छ आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श असे शहर मिळेल, असा विश्वास आ. यड्रावकर यांनीनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी शिरोळ शहरासाठी भरघोस निधी देऊन सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे शिरोळकरांनी आभार मानले.प्रारंभी मुख्याधिकारी अजित नरळे यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत शिरोळ शहरात ६१.३५ कोटींचा मलनिस्सारण व भुयारी गटार प्रकल्पात ६ एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र, ७१ कि.मी. लांबीची कलेक्शन सिस्टिम, पंपिंग स्टेशन आणि नाला क्रॉसिंगचा समावेश आहे.सध्या पाईपचा पुरवठा व डिझाइनचे काम पूर्ण झाले आहे.प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जाणार असल्याने प्रदूषण कमी होईल,पर्यावरण सुरक्षित राहील आणि भूमिगत गटारीमुळे शिरोळ शहर स्वच्छ व सुशोभित बनेल असे सांगितले.
यावेळी बाबा पाटील, विजय देशमुख, बजरंग काळे, संभाजी भोसले, अमर शिंदे, शिवाजीराव देशमुख, दादासो कोळी, अविनाश टारे, श्रीवर्धन देशमुख,राजेंद्र माने, सुरज कांबळे, भूषण काळे, चंद्रशेखर चुडमुंगे, आशुतोष पाटील, रावसाहेब पाटील, एन.वाय. जाधव, लक्ष्मण भोसले आदी उपस्थित होते.