कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पणोरे येथील वसंत ईश्वरा पाटील (वय ४८) यांना संशयित आरोपी सचिन तुकाराम काटकर (रा.पणोरे पैकी बळपवाडी) याच्या मोटारसायकलने धडक दिल्याने ते जखमी झाले होते. त्यांना सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले. अखेर १० मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद मुलगा तुषार वसंत पाटील यांनी कळे पोलीस ठाण्यात दिल्याने सचिन काटकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पणोरे येथील कळे-म्हासुर्ली मुख्य रस्त्यावर ६ मे रोजी वसंत पाटील हे शेतामधील औषध खरेदीसाठी प्रमोद कांबळे यांच्या घरासमोरून एसटी स्टँड जवळ पणोरे येथे पायी चालत जात होते. यावेळी कोल्हापूरकडून येणाऱ्या सचिन काटकर (रा.पणोरे पैकी बळपवाडी) यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.०७ के ५३५५ या भरधाव गाडीने वसंत पाटील यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये ते रस्त्यावर आपटल्यामुळे डोक्याला जबर मार लागून ते बेशुद्ध पडले होते.
त्यांना तातडीने सीपीआर येते पाठविण्यात आले. परंतु त्यांचा दि.१० मे रोजी मृत्यू झाला. तुषार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कळे पोलीस ठाण्याकडून आरोपी सचिन काटकर याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्यानुसार तब्बल १० दिवसांनी म्हणजे २० मे रोजी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटील करत आहेत.