कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शनिवार दि. २१ नोव्हेंबर २०२० रोजी केवळ एका दिवसात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून ७६७ जणांकडून तब्बल ८० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न राखणे, हॅण्डग्लोज न वापरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबददल काल (शनिवार दि. २१ नोव्हेंबर २०२० रोजी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून तब्बल ८० हजार ३००  रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ७४९ जणांकडून ७४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर सामाजिक अंतर न ठेवल्याबददल ६ जणांकडून ३ हजाराचा दंड वसूल केला आहे, मास्क व हॅण्डग्लोज न वापरल्याबददल ६ जणांकडून १ हजार २०० रुपायांचा दंड आणि सार्वजनिक ठिकाणी थूंकल्याबददल ६ जणांकडून १ हजार २०० रुपयांचा दंड  वसूल केला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणाव्यात, कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याचे सांगून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, शहरवासीयांनी तसेच व्यापारी, व्यावसायिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी विशेषत: रस्त्यांवर न थुंकणे या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे राबवित असून या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.