कुरुंदवाड (प्रतिनिधी) : दामदुप्पटीचे अमिष दाखवून आठ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पुरंदर श्रीपाल केस्ते आणि अतिश अशोक आलगुरे (दोघे रा. गौरवाड, ता. शिरोळ) यांना कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली. दहा महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. महेश बबन जाधव (रा. गौरवाड) यांनी फसवणूक झाल्याची तक्रार येथील पोलिसांत दिली होती.

दरम्यान, दोन्ही आरोपींना जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनज्योती वनमार्ट ट्रेडर्स ‘ या कंपनीत पैसे गुंतवून महीण्याला ५ टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून आरोपी केस्ते, अलगुरे यांनी फिर्यादी जाधव यांच्याकडून ८ लाख रुपये घेतले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा मिळत नसल्याने व कंपनीने दिलेला धनादेशही न वटल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

माहे मे ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ही फसवणूक झाली होती. त्यामुळे फिर्यादी जाधव यांनी केस्ते, आलगुरे यांच्यासह विजय मोहन होनकांबळे, रेश्मा विजय होनकांबळे (दोघे रा. अथनी, जि. बेळगांव) अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.