मुंबई: शासनाच्या शालेय शिक्षणाच्या विभागातून ४७ लाख ६० हजार रूपये चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरी द्वारे ४ टप्प्यात ४७ लाख ६० हजार रूपये काढल्याची माहिती समोर आली आहे. एकूण चार व्यक्तीच्या नावे ही रक्कम जमा झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालय येथील बँकेत असलेल्या खात्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी आता मरीनड्राईव्ह पोलीस ठाणे येथे चार जणांवर सात कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम 419, 420, 465, 467, 471, 473, 34 भादवि अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मंत्रालयातील बँक शाखेतून अज्ञात चोरट्यांनी पैसे काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकूण चार व्यक्तीच्या नावे ही रक्कम जमा झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. हे पैसे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. पण हे चौघे कोण आहेत? हे नेमके कोणी आणि का केले? याबाबतचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर, ऐन निवडणुकीच्या काळात चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पण महिन्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने याबाबत आता अनेक प्रश्न निर्माण करण्यात येत आहे.

महिन्याभरात दुसऱ्यांदा शासनाच्या खात्यात चोरी झाल्याने राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे. मागील महिन्यात पर्यटन विभागाच्य खात्यातून 67 लाख चोरीला गेले होते. याचा तपास अद्यापही मरीन लाइन्स पोलिसांकडून करण्यात येत आहे. पण एका महिन्यात दुसऱ्यांदा थेट शासनाच्या खात्यातूनच पैसे चोरी झाल्याने याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तर, सीसीटीव्ही असताना देखील हा प्रकार घडल्याने याबाबत आता शंका उपस्थित करण्यात येत आहे.