सिक्कीम ( वृत्तसंस्था ) सिक्कीममध्ये झालेल्या मुसळधार पावसामूळे महापुर आला असून, प्रचंड हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय तीस्ता नदीतून 22 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. लष्कर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचाव कार्यात गुंतले आहे. दरम्यान, पर्यटक सिक्कीमला जाण्याचा विचार करत असल्यास सहल काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यास सांगण्यात आले आहे.


लाचेनजवळील शाको चो तलाव नजिक परिसरात अधिक पाणी वाढण्याची भीती आहे. हे पाहता अधिकारी आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात व्यस्त आहेत. याशिवाय पुरात लष्कराच्या छावणीतून बॉम्ब आणि शस्त्रेही वाहून गेली आहेत. या शस्त्रांचाही स्फोट होण्याची भीती आहे.

सिक्कीमचे मुख्य सचिव विजय भूषण पाठक यांनी सांगितले की, लाचेन आणि लाचुंगमध्ये सुमारे 3000 लोक अडकले आहेत. 3150 लोक मोटारसायकलवरून गेले होते आणि अडकले आहेत. विजय भूषण यांनी सांगितले की, या लोकांना लष्कर आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बाहेर काढले जात आहे.

ग्लेशियर सरोवर फुटल्यामुळे सिक्कीमच्या वरच्या भागात अचानक पूर आला होता. त्यानंतर हिमनदी तलाव फुटला, चुंगथांग धरणातून पाणी सोडले आणि तिस्ता नदीच्या पाण्याची पातळी बुधवारी सकाळी लक्षणीय वाढली, ज्यामुळे हिमालयीन राज्यात मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.

बुधवारी सकाळपासून लष्कराकडून बेपत्ता जवानांचा मोठ्या प्रमाणावर शोध सुरू आहे. दरम्यान, त्रिशक्ती कॉर्प्सचे कर्मचारी उत्तर सिक्कीममधील चुंगथांग, लाचुंग आणि लाचेन या बाधित भागात अडकलेल्या नागरिकांना आणि पर्यटकांना वैद्यकीय मदत आणि टेलिफोन कनेक्टिव्हिटी देत ​​आहेत.

तीस्ता खोऱ्यातील घडामोडीवर सरकारची नजर..!

दरम्यान, सरकारी वीज कंपनी NHPC आपले जलविद्युत प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. अचानक आलेल्या पुरानंतर तीस्ता खोऱ्यात काय घडत आहे यावर मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर सिक्कीममधील जलविद्युत प्रकल्पांना झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करणार असल्याचे ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे.

3-4 ऑक्टोबरच्या रात्री अचानक आलेल्या पुरामुळे तीस्ता-V जलविद्युत केंद्राचे तारखोला आणि पामफोक पर्यंतचे सर्व पूल पाण्याखाली गेले किंवा वाहून गेले. सध्या तीस्ता-V जलविद्युत केंद्रात वीजनिर्मिती होत नाही. NHPC ने आपल्या प्रकल्पातून सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.