वारणानगर (प्रतिनिधी) : येथील वारणा सहकारी दूध संघाकडून दिवाळीसाठी दूध फरक बील, कामगारांना पगार व बोनस यासाठी तब्बल ३० कोटी रुपये देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केली. म्हैस दूधासाठी प्रतिलिटर २ रुपये १० पैसे फरकबील देण्यात येणार असून २६ ऑक्टोबरपासून उत्पादकांच्या खात्यावर जमा होईल, असे त्यांनी सांगितले.
डॉ.कोरे म्हणाले की, कोवीड-१९ या महामारीच्या काळात दूध वितरण, पदार्थ निर्मिती, मिठाई आदीच्या विक्रीवर गंभीर परिणाम झाला. पण संघाने दूध उत्पादकांचे दूध संकलन करून त्यांना साथ दिली. संघाने आपले कामकाज अत्यंत काटकसरीने केल्यामुळे दूध उत्पादकांना फरक बील, कामगारांना पगार व बोनस देता येणार आहे. तसेच सभासदांना सण–उत्सवाच्या निमित्ताने श्रीखंड, तूप वाटप करून दूध उत्पादक व सभासदांना सहकार्य केले. दूध उत्पादकांना पशूखाद्य अशा विविध योजनांसाठी अनुदान देखील दिले आहे.
कोरोनाच्या काळात दूध उत्पादक, सभासद, कामगारांचा पगार वेळेत देण्याचे काम केले. वारणा दूध संघ व संघाशी संलग्न असणाऱ्या तात्यासाहेब कोरे दूध – साखर, वाहतूक संस्था, सावित्री महिला औद्योगिक संस्था, अमृत सेवक पतसंस्था व डॉ.आर.ए.पाटील सहकारी पतसंस्था यांच्या कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे.
जत तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर उत्पादकांना या वर्षी प्रथमच फरक बील देण्याचा निर्णय घेतला असल्याचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. यावेळी मुख्य अकौटंस मॅनेजर सुधीर कामेरीकर, संकलन व्यवस्थापक अर्चना करोशी, मार्केटिंग अधिकारी अनिल हेर्ले आदी उपस्थित होते.